Friday, 23 March 2012

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा !

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा !
नवी मुंबई दि. २३-३-२०१२:



आज चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९३४.  या संवत्सराचे नाव आहे नंदन. परत ६० वर्षांनी नंदन संवत्सर येईल.  जसे प्रत्येक दिवसाला (वाराला),  प्रत्येक महिन्याला नाव आहे,  तसे  प्रत्येक वर्षालाही नाव आहे. एकूण ६० नावांची संवत्सरे आहेत. ६० वर्षांचे एक युग. आपल्यासारखे चीनमध्येही वर्षांना नावे देण्याची पद्धत आहे. 

असो; हे पुराण सांगण्याचे कारण म्हणजे नवीन वर्ष सुरु झाले कि काहीतरी नवीन, वेगळे सुरु करण्याची इच्छा होते. नवीन संकल्प सोडले जातात. पुढे त्यातले किती टिकतात हा भाग वेगळा. पण कमीत कमी काही बदल घडतात. आपल्या धर्मात मुहूर्त फळाचे महत्व सांगितले आहे. योग्य मुहूर्तावर कामे केली तर ती यशस्वी होतात, अशी आपली धारणा आहे. म्हणूनच महत्वाच्या कार्य प्रसंगी आपण मुहूर्त पाहतो. साडे तीन महत्वाच्या मुहूर्तांपैकी गुढी पाडवा एक आहे. त्यामुळेच गुढी पाडवा आजकाल फार जोशात साजरा होतो. नवे वाहन खरेदी, घर, किंवा इतर  मोठी गुंतवणूक गुढी पाडव्याला मोठ्या प्रमाणावर होते.  आजकाल सर्वच गोष्टींचे व्यापारीकरण होते, त्याला पाडवा तरी कसा अपवाद राहील. पेपरमधील जाहिराती, पुरवण्या, हे पाडव्याचे मार्केटिंग करण्याचाच प्रकार आहे. लोक पण अतीच श्रद्धाळू होत आहेत असे वाटते.  कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. 

मी मुहूर्ताच्या विरुद्ध नाही, पण मलाही अतिरेक मंजूर नाही. सगळे दिवस देवानेच घडविले आहेत तर देव कशाला त्यात भेद भाव करील ? काही लोक मला माहित आहेत कि अमावस्येला काहीच काम करत नाही. उलट एखाद्या कामात अमावस्येचा खोडा घालण्याचे काम करतात. अमावस्येचा इतका बाऊ कशाला करतात हे मला कळत नाही. त्या दिवशी काय आपण जेवण बंद करतो ? दैनंदिन कामे चालूच राहतात ना ? माझ्या माहितीत अश्या व्यक्ती आहेत कि ज्या खूप हुशार,  कर्तबगार, व  यशस्वी आहेत, ज्यांचा जन्म अमावास्येला झाला आहे ! अहो, दिवाळी नाही का आपण अमावस्येला करतो ? लक्ष्मि पूजन जर अमावस्येला करतो, तर तो दिवस वाईट कसा होईल ? 
श्रद्धा व अंधश्रद्धा यामधील फरकाची रेखा  फार धूसर आहे. अंधश्रद्धा वाईटच. पण श्रद्धा हि वाईट नाही, खूप कामे केवळ  श्रद्धेवर होतात, पण हा फरक अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांना कोण सांगणार, ते सर्वच श्रद्धा मोडीत काढायला निघाले. त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव असतो. 

भविष्याबाबत मला त्याच्या बाजारीकरणाचा फार राग आहे. या लोकांना काही काम धंदे नाहीत. त्यांच्या  (बोगस )  सल्ल्यानुसार  तुम्ही  तुमचे आयुष्य जगायचे ? काय अधिकार आहे या भविष्य वाल्या  लोकांना ? तुम्ही म्हणाल कि सहजच गम्मत म्हणून भविष्य पाहतो. पण  त्याचा इतका प्रचंड प्रभाव दिसतो, कि 'पाण्यापासून धोका' असे भविष्य दिसले कि पाणी पिण्यापुर्वीसुद्धा दहावेळा विचार करतात. तुम्ही तुमची स्वतंत्र विचार करण्याची व निर्णय घेण्याची क्षमताच गहाण टाकली आहे.  'राशी चक्र' हा कार्यक्रम लागला कि मी  TV  बंदच करून टाकतो. ( त्यामुळे थोडी भांडणे होतात !).   या भविष्य वाल्या   लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर का विश्वास ठेवत नाही ? .  भविष्य पाहणारे प्रतिक्रियात्मक आयुष्य जगतात असे मला वाटते. म्हणजे आयुष्याचा सुकाणू स्वतःकडे न ठेवता   केवळ भविष्यावर सर्व मदार ठेवतात.  कमकुवत मने हे भविष्याचे बळी ठरतात.  असो हि सर्व मते वैयक्तिक आहेत. जरुरी नाही कि तुम्ही सहमत व्हा ; पण जर पटत असेल तर जरूर  प्रतिकिया कळवा. 
गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!

     

No comments:

Post a Comment