" ते २१ दिवस.... "
दि. २५ मार्च २०२०, गुडी पाडव्याच्या
दिवसापासून कोरोना विरुद्ध लढाईचा
भाग म्हणून देशव्यापी २१ दिवसांचा लॉक-डाऊन सुरु झाला, आणि सर्व जनजीवनच ढवळून निघाले आहे.
आज तर केवळ पाचवा दिवस आहे. अजुन १६ दिवस बाकी आहे. पेपर जरी बंद असला तरी टीव्ही, व्हाट्सअप.
युट्युबवर व इतर मीडियावर इतक्या घडामोडी, बघायला मिळतात, कि मला लगेच
लिहिण्याचा मोह आवरला नाही.
आदरणीय मोदीजींनी दि. २३ मार्च २०२०
रोजी राष्ट्राला उद्देशुन केलेल्या भाषणात, "आज रात बारा बजेसे...." असे म्हटल्याबरोबर, सगळ्या देशवासीयांच्या हृदयाची स्पंदने तीव्रतेने वाढली. नोटबंदीच्या
पूर्वानुभवामुळे, आता काय नवीन वाढून ठेवले आहे, इकडे करोडो लोकांचे लक्ष होते.
हात जोडून अत्यंत कळवळीने त्यांनी
सगळ्यांना २१ दिवस घरातच राहण्याचे आव्हान केले. या पद्धतीनेच आपण कोरोना
व्हायरस चा फैलाव स्थगित करू शकतो व या महामारीपासून स्वतःला, कुटुंबियांना व पर्यायाने देशाला वाचवू शकतो. थोडक्यात हे राष्ट्रीय
कर्तव्य मानून आपण सगळेजण आपली जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे वागण्याची गरज आहे, अन्यथा इटली, स्पेन, अमेरिका व इतर देशांसारखी दयनीय अवस्था होण्यास वेळ लागणार नाही.
'लॉक-डाउन'
हि काही आंनदी घटना नाही.
रोज टीव्हीवरुन कोरोनाच्या भयावह बातम्या ऐकून टीव्ही बंदच करावासा वाटतो. मग
या बंदिवासात करायचे तरी काय ? त्यात लॉक-डाऊन हा अचानक लादला गेल्यामुळे, कोणालाहि पूर्व तयारीला वेळच
मिळाला नाही. मानसिक दृष्टया पण लोक एकदम तयार नव्हते. त्यामुळे पहिले एक-दोन दिवस
लोक आभाळ फाटल्यागत खरेदी करत सुटले. मोदीजी सांगत होते जास्त साठवणूक करू नका, तरी 'सामाजिक दूरी' धाब्यावर बसवून लोक बेजाबदारपणे वागत होते. प्रशासनाने कठोरपणे
दंडुके हाणल्यावर हळू हळू येताहेत मार्गावर. मला काळजी वाटते मेडियामधल्या काही बेजबाबदार
लोकांची, जे फेक न्यूज पसरवितात व
लोकांना धीर द्यायचे सोडून, भीतीचे वातावरण
जाणीवपूर्वक करताहेत. उदा. दिल्लीवरून हजारो संख्येने मजूर उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांमध्ये, लॉक डाउनला न
जुमानता निघाले, याला बहुतांशी मीडिया व काही राजकारणीसुद्धा जबाबदार आहेत.
सर्व प्रथम, माझ्या मते गरज आहे मानसिक संतुलनाची. मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचा एक व्हिडिओ 'इमोशनल हायजिन' या नावाचा अतिशय माहितीपूर्ण व समाजाला लॉक-डाऊनला यशस्वीपणे सामोरे
जाण्यासाठी तयार करणारा आहे. त्यांनी 'सत्य' व 'सत्याची कहाणी ' यात भेद करून, आपण फक्त 'सत्य' घ्यायचे
व बाकी (कहाणी) टाकुन द्यायची असे
सांगितले. उदा. समजा, आज मॉर्निंग वॉकला कमी लोक होते. या सत्याची कहाणी लोक अशी सांगतात , "जाम घाबरलेत लोक, कोणी फिरकतच
नाही". या अशा कहाणीमुळे विनाकारण 'भय' निर्माण होऊ शकते. मीडिया तर
या भयभीत करण्यात फारच अग्रेसर. "कोरोनाचा कहर " "कोलमडला" असे भडक मथळे आपण नेहमीच
बघतो. थोडक्यात, आपल्याला व्हाट्सअप किंवा
इतर माध्यमातून जी माहिती मिळते, त्यातून फक्त 'FACTS' घ्यायचे, कहाणी फेकून द्यायची.
त्यामुळे आपल्याला भय वाटणार नाही; व मानसिक संतुलन बिघडणार नाही. तटस्थ
स्थिरपणे निर्णय घेता येईल.
एरव्ही आपण कामात
इतके 'व्यग्र' असतो कि विकेंडची सतत वाट पाहतो. सुट्टी कशी निघून जाते कळत नाही, सोमवार उजाडला कि नेहमीचे रडगाणे सुरु. आज इतकी मोठठी सुट्टी मिळाली
आहे तर तो बंदिवास वाटायला लागला ? बदला हि
मानसिकता. हि २१ दिवसांची सुट्टी तुमचे आयुष्य कायमचे बदलवून टाकणार
आहेत. ऐतिहासिक परिस्थिती आहे. आज आपण काय
करतो, शिस्तीत राहतो का, यावर भविष्य निर्भर
आहे. वर्गात मोजकेच मस्तीखोर विद्यार्थी
असतात पण त्यामुळे संपूर्ण वर्गाला शिक्षा भोगावी लागते व 'बेशिस्त' असा शिक्का लागतो. आज मोजक्याच लोकांच्या बेशिस्तीमुळे कोरोनाचे
शिकार सगळ्या देशाला व्हावे लागेल. लॉक डाउन १०० % यशस्वी झाला पाहिजे, ९९ % सुद्धा चालणार नाही, कारण त्या १ % मधे
उरलेल्या ९९ % ला अयशस्वी करण्याची ताकद आहे.
सामाजिक दूरी ठेवल्याने आपण 'लक्ष्मण रेषेत' राहु व कोरोनाला यशस्वी झुंझ
देऊ शकू. आपल्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल व्यवस्था, पॅरामेडिक, फार्मा कंपन्या, अत्यावश्यक सेवा पुरविणारे, मीडिया
कर्मी , Air India, पोलीस कर्मी,
सफाई कामगार, प्रशासन सरकार व आपले आदरणीय
पंतप्रधान, हे सगळे Corona
Warriors जीवापाड धडपड
करताहेत. आपण त्यांच्यासाठी (खरं तर आपलाच स्वार्थ आहे यात) इतकी साधी गोष्ट पण
करू शकत नाही ? Janata
Curfew च्या दिवशी संपूर्ण
देशाने ५ मिनिटे त्यांना टाळ्या, थाळ्या , शंखनाद करून अभिवादन केले, ते उत्तमच होते. पण तेवढ्याने झाले का ?
पहिले काम - 'कंटाळा' हा शब्द भिरकावून देऊ या. या कोरोना आव्हानाला पूर्ण शक्तीनिशी सामोरे जाउया.
आता ३३ वर्षापूर्वी अत्यंत गाजलेली रामायण मालिका, व तसेच महाभारत मालिका दिवसाला दोन दोन भाग दाखवायला सुरवात झाली
आहे. फारच सुंदर कल्पना आहे, आपल्याला अडकवून
ठेवण्याची. सहकुटुंब एन्जॉय करण्याची व लॉक डाउन यशस्वी करण्याची सुद्धा. आजच्या 'मनकी बात'
मधे पन्तप्रधानांनी लॉक
डाउन मुळे नागरीकांची जी गैरसोय झाली
त्याबद्दल माफी मागितली व दुसरा कोणताच पर्याय नसल्याने, हे कठोर काम करावे लागले, असे सांगितले. मला तर वाटते माफी जनतेने मागायला पाहिजे PM ची. लोक घरी बसून कोणावर उपकार करीत नाही आहेत तर स्वतःच्या
स्वास्थ्यासाठी घरी बसला आहेत. PM नि वेगवेगळ्या
लोकांचे अनुभव शेयर केले. Social distancing पाळा याचा अर्थ Social interaction कमी करा, असा नाही. उलट या संधीचा उपयोग करून भावनिक अंतर कमी करा, असे त्यांनी सांगितले.
घरातल्या घरात करण्यासारख्या खुप गोष्टी आहेत. ‘ वेळ नाही ’ या सबबीखाली मागे राहिलेल्या गोष्टी, कामे असो वा छंद, आता करू शकतो. आता
वेळच वेळ आहे.
जगाच्या तुलनेने (६,८०,४५३ केसेस ,
३१,९१३ मृत्यू), भारताची
या क्षणाची स्थिती अगदी
वाईट नाही( ९७९ केसेस,
२५ मृत्यू ). पण थोडा जरी
निष्काळजीपणा दाखविला, तर केसेस हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. जगभर मोदींच्या
दृष्टीची तारीफ होत आहे. प्रगत देशांनीही
या वेळी कोरोना पुढे गुढगे टेकले, कारण त्यांनी मानवतेपेक्षा अर्थकारणला अग्रक्रम दिला. G-२० शिखर परिषदेत त्यामुळे मोदींचा
वेगळेपणा दिसुन आला. मोदींच्या 'वैश्विक नेतृत्व'
गुणांचा अभिमान वाटतो.
आपल्या
आयुष्यातील हा अभूतपूर्व, व
कसोटीचा प्रसंग आहे. संयम व संकल्प
यांच्या साहाय्याने या संकटावर मात
करू, असा विश्वास वाटतो. आजचा भारत
वेगळा आहे. मोदींनी आपला आत्मविश्वास
वाढविला आहे. Janata curfew च्या वेळी सगळया भारतीयांचा हुंकार दिसून आला. "When goings get tough, tough gets going". लॉक-डाऊन च्या अग्निदिव्यातून आपण
अजून बलशाली होऊन बाहेर पडू व पुढील कालावधीत मागे वळून अभिमानाने म्हणू कसे होते "ते २१ दिवस... "
खूपच ! प्रवाही, मर्मावर बोट ठेवणारे लिखाण मामा 🙏🌹
ReplyDeleteधन्यवाद मेहुल. सकारात्मक रीतीने या कालावधीचा सगळ्यांनी उपयोग करावा या हेतूने lockdown संपण्याच्या आधीच लिहिला.
Delete