Monday, 7 March 2016

एक अविस्मरणीय अनुभव !

एक  अविस्मरणीय  अनुभव  !

      २९ फेबृवारी  २०१६. हा माझ्या आयुष्यातील एक अत्यंत अविस्मरणीय दिवस राहील. 
सहसा,  २८/२९ फेब्रुवारी हा बजेट दिवस असल्यामुळे  एका CA चे, त्या दिवसाचे रूटीन ठरलेले असते.  TV समोर बसून अर्थ मंत्र्यांचे भाषण ऐकणे, असा शिरस्ता गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालत आला आहे.  CA व्यवसायामुळे, बजेट  बारकाईने ऐकणे आवश्यक ठरते.  सर्व लोकांना CA  कडून अपेक्षा असतात. बजेट वरील प्रश्नांना CA कडून समाधानकारक  उत्तरे अपेक्षित असतात.  अनेकदा बजेट  स्पीच चालू असतांनाच काहीजण फोनवर त्यांच्या शंका कुशंका विचारतात. असो, या वर्षी रुटीन मधे थोडा फरक पडला. 
      या वर्षी,  बजेट  TV  वर न पाहता, प्रत्यक्ष संसदेत  बसून ऐकण्याचा / पाहण्याचा  योग आला !  विश्वास बसत नाही ना ?  खरे आहे; माझा स्वतःचा सुद्धा विश्वास बसत नव्हता. आमचे  मित्र  CA श्रीकान्त लिमये,  ICAI,  नवी मुंबई शाखेचे गत वर्षाचे अध्यक्ष,  यांच्यामुळे, हा  दुर्मिळ योग आला.  त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच.  त्यांच्या  कल्पकतेने  त्यांनी ठरविले कि नवी मुंबई चे सर्व Past  Chairmen यांना  बजेट प्रत्यक्ष संसदेत बसून दाखवायचे.  त्यामुळे  हे  सर्व जुळून आले. 
       सर्व  कडक सुरक्षेचे सोपस्कार पार करून  सकाळी  १०.४५ वाजता आम्ही पार्लमेंटच्या,  लोकांसाठी असलेल्या आसनांवर स्थानापन्न झालो.  " याची देही याची डोळा " असा अनुभव मी घेत होतो. समोरील  दृश्य जास्तीत जास्त  साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण मोबाईल / कॅमेरा संसदेत निषिद्ध आहे. सर्व खासदार 'चेहऱ्याने ' परिचित होते.  सर्व प्रथम दिसले श्री.आडवाणीजी. सर्वांना अभिवादन करून ते  स्थानापन्न झाले .  अर्थ मंत्री श्री. जेटली, आकाशी निळ्या रंगाच्या जाकेट मधे, आधीच आपल्या जागेवर बसलेले होते. गडकरी, वेन्कैया व अजून काहीजण जेटलींना अभिवादन करून आपापल्या स्थानावर बसले. नंतर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले एका व्यक्तीच्या आगमनाने. शुभ्र पांढऱ्या पोशाखात, अत्यंत डौलदार चालीत, सगळ्यांना नमस्कार करत पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी आले.  समोरच्या बाजूला बसलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी स्मितहास्याने, हात जोडून नमस्कार केला व स्थानापन्न झाले. अर्ध वर्तुळाकृती आकाराच्या संसद भवनात केंद्र बिंदूच्या जागी थोडया उंचीवर एक मोठे आसन होते, मा. श्रीमती सुमित्रा महाजन, स्पीकर महोदया यांचे. त्यांचे  आगमन होताच ललकारी झाली. सदस्यांनी  'भारत माताकी जय ' असा पुकारा केला व स्पीकर महोदया उच्च स्थानावर विराजमान झाल्या.  त्यांच्या उजव्या बाजूला सर्व सत्ताधारी व डाव्या बाजूला विरोधी पक्षाचे सदस्य बसले होते.  त्यांच्या दोन्ही बाजूला उंचावर दोन मोठे स्क्रीन होते, ज्यावर संसदेतील दृष्य दिसत होते.  पहिल्या रांगेत सर्व पक्षनेते व वरिष्ठ सदस्य  जसे   डावीकडे मुलायम सिंग, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे  व  इतर  दिसत होते. राहुल  गांधी व  जोतीरादित्य शिंदे हे  सोनियाजींच्या मागच्या रांगेत होते.
       ११ वाजता सभेची सुरवात होणार तेवढयात विरोधी पक्ष सदस्यांनी एकदम गलका सुरु केला.  हात वारे करून आरडा ओरड करून गोंधळ घालायला सुरवात केली. त्यांना खा. स्मृती इराणी यांच्या विरोधात हक्क भंग प्रस्थाव करायचा होता.  स्पीकर महोदयांनी २ मिनिटे ऐकून घेतले व म्हणाल्या कि दि. २९/२/२०१६ ची प्रस्थावाची नोटीस मिळाली व ती त्यांच्या विचाराधीन आहे. विषय संपला. लगेच श्री . जेटलींनी बजेट वाचायला सुरुवात केली.  पुढे जवळ जवळ दीड तास जेटलींचे वाचन चालू होते. सत्ताधारी सदस्य बाके वाजवून त्यांना प्रोत्साहीत करत होते. विरोधक निष्प्रभ होऊन मक्ख होते. वाचन झाल्यावर आवाजी मतदानाने अर्थ बील संसदेत मांडणे  मंजुर झाले. विरोधकांनी परत गलका सुरु केला, पण स्पीकर महोदयांनी 'house is  adjourned' असे घोषित करून  त्या दिवसाची कार्यवाही संपल्याचे जाहीर करून टाकले.
           बजेट चालू असताना, मी सदनाची कार्यवाही थेट बघत होतो.  सर्व सदस्यांना बारकाईने न्याहाळत होतो. जवळ जवळ बहुतांश सदस्यांना ओळखु शकलो.  इतर वेळी,  TV वर   बघताना , कॅमेरा जे दाखवेल तेच आपण बघू शकतो.  आज मात्र संपूर्ण सभागृह बघू शकत होतो. शिवाय स्क्रीन वर (नेहमी  TV वर  दिसणारी ) दृष्य सुद्धा बघत होतो.  खूप छान वाटले या सर्व सदस्यांना व लोकसभेला प्रत्यक्ष कार्यवाही  करताना.  कार्यक्रम संपल्यावर, बरेच खासदार बाहेर पडताना TV  मिडिया वाले  मुलाखती साठी  त्यांना अडवत. त्यामुळे  खुप खासदारांना जवळून पाहण्याची संधी मिळाली.  निर्मला सीतारामन, न थकता मुलाखात देत होत्या.  काही खासदार मात्र पक्षाने पढवलेली  पट्टी वाचत, 'बजेट कसे गरिबांच्या विरोधात आहे ' असे तावातावाने  कॅमेरासमोर सांगत होते.  खा. विनोद खन्ना  शांतपणे बाजूने निघून गेला. कोणीही त्याला प्रतिक्रिया विचारली नाही. वाईट वाटले.
          एका CA ला  बजेट  अर्थ मंत्र्यांच्या तोंडून प्रत्यक्ष संसदेत बसून ऐकायला / बघायला व अनुभवायला मिळावे यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते ? मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो, अशी संधी मिळाली म्हणून.
            असा होता माझा संस्मरणीय दिवस ! 







       










No comments:

Post a Comment