Thursday, 12 November 2015

सागरा प्राण तळमळला !

सागरा प्राण तळमळला  !

हे शब्द ऐकल्यावर  वीर सावरकरांची आठवण होणार नाही असे  कोणी मराठी संवेदनशील मन  असूच शकत नाही .  माझ्या  सावरकरांच्या स्मृती जागृत होण्याचे कारण म्हणजे , माझी अंदमान यात्रा

अंदमान व निकोबार द्वीप हा केंद्र शासित प्रदेश असून त्याची राजधानी पोर्ट ब्लेयर  आहे .  मुंबई  ते  पोर्ट ब्लेयर हे  अंतर जवळ जवळ २४०० कि. मि. आहे . साडे चार  तासाचा प्रवास करून विमान जसे पोर्ट ब्लेयर जवळ आले तशी, " वीर सावरकर  आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आपका  स्वागत है " अशी  सूचना ऐकून मला खूप छान वाटले.  उशिराने का होईना , पण काही चांगल्या गोष्टी घडत आहे.


वीर सावरकरांनी  ( १९११ ते १९२१)   १० वर्षे  अत्यंत कठोर कारावासात ज्या सेल्युलर जेल मधे काढली, ते  जेल आज राष्ट्रीय स्मारक आहे.


'कठोर' हा शब्द सुद्धा मऊ वाटावा, इतका कठोर कारावास सेल्युलर जेल मधील कैद्यांना भोगावा लागत असे. दिवसाला  नऊ तास कोलू वर  १५० किलो चे वजन बांधून , ३० पौंड तेल गाळावे लागत असे . दिवसाचा ३० पौंडाचा कोटा पूर्ण न झाल्यास त्रुटीच्या  प्रमाणात शिक्षा.  ३० पौंड तेल बैलांकडून सुद्धा होऊ शकत नाही ! कल्पना करा माणसांना  जनावरांपेक्षा वाईट वागणूक, या  जेलमधे  मिळत होती .  
गणेश दामोदर सावरकर म्हणजे विनायक दामोदर अर्थात वीर सावरकर यांचे  ज्येष्ठ बंधू . दोघेही सेल्युलर जेल मधे बंदिस्त ; पण दोन वर्षे एकमेकांना याची माहितीच नव्हती .
  
'बॉम्बे'वरून ( तेंव्हा 'महाराष्ट्र' नव्हता )  तीनच स्वातंत्र्य सैनिक सेल्युलर जेल मधे होते. त्यात दोन सावरकर बंधू होत.  बंगाल, पंजाब वरून जास्त कैदी येथे होते.

या जेलमधे फार कमी फाशी दिल्या गेल्या. फाशी सुनावलेल्या कैद्यांना इतक्या लांब आणण्याची तसदी ब्रिटीश कशाला घेतील ?
                                                                                                                    

या   इमारतीत सर्वात वरच्या मजल्यावरील कोपऱ्यातील (उजवीकडील) कोठडी म्हणजे सावरकरांची कोठडी. त्यांची कोठडी खास होती. एक तर , त्या कोठडीला दोन दरवाजे. दुसरे, दोन बाजूंनी लक्ष ठेवता येईल असा कोपरा.   सावरकरांनी मार्सेलिस वरून ज्या  अविश्वसनीय रीतीने सुटका करून घेतली , (ज्याची तुलना, शिवाजी महाराजांच्या 'आग्र्याहून सुटकेशी'  होऊ शकते ) , त्यामुळे ब्रिटीश धोका पत्करण्यास तयार नव्हते.
वीर सावरकरांनी जे कष्ट देशासाठी सोसले , जे  हाल सहन केले, त्या पुढे आपल्याला होणारे कष्ट काहीच नाही. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा उगाचच बाऊ करण्याची सवय आहे.  सेल्युलर जेल येथे जाऊन आल्यावर खुप भारावून गेलो. स्वातंत्र्यापूर्वी काय, किंवा स्वातंत्र्या नंतरसुध्दा , सावरकरांवर आपल्या देशाने /सरकारने अन्यायच केला  अशी भावना निर्माण झाली. सद्य सरकार हा अन्याय, अंशतः तरी दूर करेल अशी आशा वाटते.