Saturday 26 January 2013

परम वैभवं नेतुमेतद स्वराष्ट्रं ...

परम वैभवं नेतुमेतद स्वराष्ट्रं ...

२६ जानेवारी २०१३ :


        आज ६४ व्या  प्रजासत्ताक दिनानिमित्त  सर्व प्रथम सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !

        झेंडा वंदन कार्यक्रम छान  पार पडला.  त्यानिमित्त दोन शब्द सोसायटी मधील लोकांसमोर बोलण्याची विनंती झाली. त्यामुळे अंतर्मुख होऊन विचार करू लागलो.

       गेल्या दोन वर्षात  विदेशवारीचे  बरेच योग आले.  नेपाळ , चीन (तिबेट ), थायलंड,  स्वीत्झर्लंड, फ्रांस  व नुकताच  अमेरिका असा व्यापक प्रवास घडला. छोटासा  stop  over  लंडन  व दोहा  येथे झाल्यामुळे इंग्लंड व कतार या  देशांनाही स्पर्श केला, असे म्हणायला हरकत नाही.  मनामधे 'आपण' आणि 'विदेशी' यांच्यामध्ये तुलना, नकळत होऊ लागली.    बाहेरचे जग पाहिल्यावर, भारताबाहेर  आपली प्रतिमा कशी आहे याचा थोडा अंदाज आला. 

       स्वित्झर्लंड मध्ये  तितलीस  पर्वतावर  १०,००० फूट उंचीवर घेऊन जाणाऱ्या केबल कार (Rotair ) मध्ये  चक्क हिंदीत  बोर्ड होता , " विश्वके  प्रथम  घुमनेवाले   गन्डोला मे आपका स्वागत है ".  खूप बरं वाटलं.  


हाच  तो  'गंडोला ', अर्थात  Rotair  (Rotating  +  Chair )



         












             अर्थात, भारतीय भाषेत बोर्ड दिसला कि प्रत्येक ठिकाणी अभिमानास्पद गोष्ट असते असे नाही.  एका  ठिकाणी   इंजल्बर्गला   हॉटेलमधे काही सूचना हिंदीत होत्या. प्रथम मला खूप अभिमान वाटला ; पण लगेच त्यातील खोचं लक्षात आली आणि वाईट वाटले.  भारतीय लोक  (काही अपवाद सोडून ) हॉटेल रूम स्वच्छ ठेवत नाही. सूचना अशी होती कि बाथ रूम ओली केल्यास १५० francs दंड आकारण्यात येईल. लाकडी  फ़्लॊरमुळे  तशी सूचना होती ; shower साठी वेगळा काचेचा भाग  (बाथ रूममधेच ) होता.  भुरट्या चोऱ्या, अस्वच्छता, व खोटेपणा काही भारतीय करतात, म्हणून हिंदीत सूचना.   ही काही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही.

            थायलंडला रिवर क्रूस करताना हिंदी गाणे, नाच , चालू होते. एक फिलिपिनो बाई  कार्यक्रम संचालन करीत होती. मराठी लोक पाहून तिने चक्क  "कामावर  जायला उशीर झाला....बघतोय रिक्षावाला " हे गाणे ठसक्यात म्हणायला सुरु केली  !  आम्ही अक्षरशः चाट पडलो. त्या बाईला मराठी एक अक्षर माहीत नाही. मग हे कसे ? नंतर समजले , कि तिच्या हातात एक चिट्ठी होती, त्यात हे मराठी गाणे तीच्या script मध्ये लिहिले होते.   असो. खूप छान वाटले.

         


San Francisco च्या  केबल tram वर खालील भारताची जाहिरात बघून बरे वाटले.

             
युनिवर्सल  स्टुडियोत  एक कृष्ण वर्णीय माणसाने  चक्क हात जोडून " सत श्रिअकाल  " "नमस्ते " अशा शब्दात स्वागत केले.  असे  वाटते कि आता भारताची दखल लोक घ्यायला लागले आहेत.

                              हे खालील दृश्य भारतातील नसून थायलंड मधील आहे. कालिया मर्दन हे दृश्य  सुवर्णभूमी  आंतरराष्ट्रीय विमानतळ , येथील आहे.    



              आश्चर्य  वाटले  का ? थायलंड च्या लोकांना  त्यात  'जातीयता ', 'धर्मांधता',  असे काही दिसत नाही.  हा  हिंदू  देश नसूनही हिंदूंची प्रतीके तेथे  प्रतिष्ठेने  जोपासली  जातात.  फक्त कल्पना करा कि असे चित्र भारतातल्या विमानतळावर आणायचे असल्यास काय  होईल ! अल्प संख्या असणाऱ्यांच्या भावना किती दुखावतील  ! सत्तेतील नेत्यांची किती  तारांबळ  उडेल !  सध्या कमी समस्या आहेत ? त्यात  भर कशाला ? जाऊ देत  ती कल्पनासुद्धा नको ! आपणच या बेगडी कल्पना जोपासतो. सुवर्ण भूमी हे नाव खर तर भारतात असायला हवे.  असो.  तसेच नेपाळच्या विमानतळाचे नाव सुद्धा  भारतीय वाटावे असेच आहे . "त्रिभुवन ".  आता वेळ आली आहे कि भ्रष्ट अनुकरण न करता आपल्या योग्य गोष्टींचा अभिमान आपण बाळगायला हवा, व मानसिक गुलामगिरीतून  आपण मुक्त झाले पाहिजे.   

            आंपण भारतीय  सर्व क्षेत्रात  जर उत्तम कामगिरी  करतो, तर या  छोट्या छोट्या गोष्टीत का  मागे पडतो ? स्त्री व  पुरुष यांच्यात समानता आणावी लागेल.  शिस्त, सचोटी, प्रामाणिकपणा, स्वच्छता, मार्दवता, व सामाजिक जाणीव  हे  गुण जर आपण अंगिकारले तर आपण  कुठल्याकुठे  जाऊ शकतो.  प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याची सुरवात स्वतःपासून करावी लागेल. केवळ कोणाकडे बोट दाखविण्यापेक्षा स्वतः पुढाकार घेऊन मार्ग काढावा लागेल. चला,  आपण आजच्या  राष्ट्रीय मुहूर्तावर ,  सुरुवात करू. रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळणे , horn  न  वाजविणे, असे खूप काही आहे कि ज्यासाठी सरकार किंवा इतर कोणी नसून आपणच जबाबदार आहोत. तेच भ्रष्टाचाराबाबत.  ही समस्या मोठी आहे.  पण  आपण तरी,  short  cut  न  घेता, रीतसर  मार्गानेच  काम करावे . निदान  भ्रष्ट  वागणूक  promote तरी  करू नये. कष्ट पडतील. proactive व्हावे लागेल.    मान्य आहे कि  बदल घडण्यास खूप वेळ लागेल.  केवळ मी सुधारणा करून  काय होणार ? असा  विचार न करता, अशी जिद्द ठेऊ कि बदल जेव्हा घडेल तेंव्हा घडू दे , मी माझे प्रयत्न सोडणार नाही.
      
            मग  आपले  भारताचे स्वप्न  "परम वैभवं नेतुमेतद स्वराष्ट्रं "  साकारायला सुरवात होईल ! 
त्यासाठी , स्वामी विवेकानंद यांचे शब्द  मनात  ठसविले पाहिजे  :
             "Arise , awake   and  stop  not till the goal is achieved ! "           

No comments:

Post a Comment