Sunday, 12 February 2017

आमचा सरदार कट्टा

 आमचा सरदार कट्टा  :

'सरदार कट्टा' या नावाविषयी मी शेवटी सांगेन, पण प्रथम या कट्ट्याविषयी. 
स्थळ : सांता क्रुझ (पूर्व ) येथील पी अँड टी कॉलनीतील ए टाईप जवळील छोट्या मैदानालगतचा छोटा कट्टा. 
कालखंड : साधारणपणे  १९७२ ते  १९८२ दरम्यान. 
पात्रे :  अरुण भगुरकर , भाऊ राणे, हेमंत देव, विवेक मुळे, राजु बोरकर, परेश क्षीरसागर, सदा जाधव, शेखर कुलकर्णी,  व अस्मादिक (माधव महाशब्दे ). 
गेस्ट अपीयरन्स : अवी भगुरकर, मोहन देव, नितीन कर्णिक, श्रीनिवास  कलगुटकर, एजाज, स्टीफन  आणि इतर. 
       आम्हा सर्वांच्या आयुष्यात व जडण घडणीत  या कट्ट्याचे  खूप  मोठे योगदान आहे. रोज संध्याकाळी आम्ही या कट्ट्यावर  बसुन मनसोक्त गप्पा, फिरक्या, असा आमचा   नेहमीचा शिरस्ता असे. राजकारण, चालू घडामोडी , क्रिकेट,  सायन्स  ( भाऊ राणे हा शास्त्रज्ञ होता ), कॉमर्स, अशा विविध विषयांवर सखोल चर्चा आम्ही करत असू.  दुसरा हव्यास म्हणजे  हायकिंग व ट्रेकिंग.  शनिवार व रविवार हे आजूबाजूच्या डोंगरांवर भटकंती, अथवा दुर्ग भ्रमण, करण्यात घालवत असू.  तिसरा हव्यास ब्रिज खेळण्याचा.  एकदा का ब्रिजचा डाव सुरु झाला, कि खाण्यापिण्याची कोणालाही  काही शुद्ध नाही, रात्रभर व दुसऱ्याही दिवशी खेळ चालूच.  हे  जरी सर्वसामान्य  वाटत असले, तरी  या ग्रुपमध्ये एक वेगळेपणा होता.  आमच्या अचाटपणाचे काही किस्से मी सांगणार आहे.  
       आम्हा सर्वांनाच वाचनाची खूप आवड.  त्यावेळी आम्ही काही मासिके उदा. इलस्ट्रेटेड विकली, सायन्स टुडे, स्पोर्टस वीक, इंडिया टुडे , रीडर्स डायजेस्ट , कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू , इत्यादी  (यात फिल्म फेयर किंवा तत्सम मासिके नव्हती ), नियमीतपणे घेत असू व ती वाचून त्यावर आपल्याला आवडलेल्या लेखावर चर्चा (कधी कधी अगदी हमरीतुमरीवर येऊन) करत असु. एकदा  सगळ्यांची वाचून झाली कि प्रत्येक सदस्य आपापल्या आवडीचे मासिक स्वतःच्या  संग्रही ठेवत असे.  मला  आर्थर हॅले ची सर्व पुस्तके वाचण्याची आवड याच कट्ट्याने निर्माण केली. 
        एकदा आम्ही घाटकोपरच्या डोंगरावर  ट्रेकिंगसाठी,  रस्ता  शोधत गेलो. वरून पवई तलाव  व IIT बाजूचे दृष्य बघून थक्क झालो. (लक्षात घ्या , त्यावेळी  मोबाईल , गुगल मॅप्स , काहीच नव्हते ).  धाडसीपणा हा गुण तर होताच, पण भाऊकडे कोणाशीही मैत्री करण्याचीहि कला होती. त्याने त्या डोगरावरील एका मजुराला थांबवले. मजूर घाबरलाच.  भाऊने त्याला नाव विचारले. शटप्पा  हे नाव कळल्यावर  त्याला विनंती केली कि त्याच्या डोक्यावर घमेल्याच्या खाली असलेल्या रुमालाचे  गोल वेटोळे मला शिकव. शटप्पाचा विश्वासच बसेना. मग तीनवेळा त्याने घडी करुन दाखवली तेंव्हा भाऊरायांना कळले. काय आनंद, नवीन तंत्र आत्मसात  केल्याचा!  त्याला धन्यवाद करून  IIT च्या बाजूने आम्ही डोंगर उतरून  परतलो.  एक कोजागिरी आम्ही याच डोंगरावर घालवली. (किती  डास  चावले ते विचारू नका !)
       कर्नाळा किल्यावरील चढाई, कळसुबाई शिखरावरील चढाई, किल्ले रायगडावरील चढाई ( रोप वे  नसताना),  भंडारदरा , रतनगड, राजगड, विसापुर किल्ला,  महाबळेश्वर - प्रतापगड स्कुटर राईड, अशा अनेक चित्तथरारक ट्रेक्स या ग्रुपबरोबर केल्या आहेत. या प्रत्येक मोहिमेत सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. विसापूरचा अनुभव असा, कि लोहगडला जाण्यासाठी आम्ही मळवली स्टेशनला अपरात्री उतरलो, तेंव्हा स्टेशन आहे कि सिग्नलला गाडी उभी आहे हे कळेना , त्यात गर्दीमुळे  आधीच ग्रुपची  फाटाफूट  झालेली. सगळेजण चढले का ? त्यात जे चढलेत ते मळवळीला उतरलेत का ? इतके प्रश्न.   मी व शेखर फक्त बरोबर होतो. गर्दीमुळे प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूने ट्रॅकवर उतरावे लागले.  काळोखात ट्रेनच्या बाजूने चालताना एक ओळखीची शीळ मी देत होतो. त्याचा परिणाम असा झाला तीच शीळ मला वेगवेगळ्या डब्यातून ऐकावयास मिळाली.  झाले ! सगळे मित्रमंडळी परत एकत्र झाल्याचा आनंद अवर्णनीय!  पुढे दुसरा गोंधळ.  काळोखात  लोहगडसाठी निघालो,  कोणाला तरी रस्ता विचारावा तर अवेळी  कोणीच भेटेना. तेवढ्यात  शेतात कोणी तरी दिसल्याने त्यांना रस्ता विचारला. एक क्षण काळजाचा ठोकाच चुकला, कारण  ज्याला विचारत होतो, ते होते बुजगावणे !. नंतर  पुढे  रस्ता चुकल्याने पोहोचलो विसापूरच्या किल्ल्यात !
        एकदा आम्ही  संध्याकाळी अचानक भंडारदऱ्याला जाण्याचा निर्णय घेऊन लगेच रात्रीच्या पॅसेंजरने आम्ही १२ जण निघालो सुद्धा. अपरात्री इगतपुरीला गेल्यावर कळले तीन दिवस अतिवृष्टीमुळे ST बसेस येतच नाही  आहेत. सकाळी बस आली तर ठीक नाहीतर वापसी.  नशिबाने बस आली व  अनिश्चिततेत  प्रवास सुरु झाला.  त्यातच एक दिवस कळसुबाई गाठायचं ठरलं.  नगर रस्त्यावर शेंडी नावाच्या छोटया गावी उतरलो व हळू  हळू  ५४०० फूट  उंचीवरील  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर "कळसुबाई" च्या दिशेने चढाई सुरु केली. अर्ध्या रस्त्यात आमचा पाण्याचा साठा संपला.  एका ठिकाणी पाण्याचा साठा  दिसला पण प्यावे कि न प्यावे  कळेना.  एका गुराख्याला विचारले कि यातील पाणी पिण्याचे आहे का, तर तो म्हणतो कसा, " हो हो, आमची गुरं ढोरं बी पित्यात. त्यात काय ! "  सत्यानाश.  आमच्यातील  मी व अजून ५ जणांनी  पुढची चढाई चालूच ठेवली. एका छोट्या विहिरीतून मोठ्या प्रयासाने, वेलींचा दोर करुन, प्लास्टिक बॅगेत  दगड भरून कसेतरी पाणी मिळवले व  आमच्या तृषार्त मित्रांना  पाणी पाजून तृप्त केले.  शेवटच्या मोठ्या खडकावरील चढाई एका भक्कम साखळदंडाच्या साहाय्याने केली (हल्ली मजबूत शिडया ठोकल्या आहेत). हा कसोटीचा क्षण होता. खाली पाहण्याची हिम्मत होत नव्हती.  शिखरावर एक छोटे मंदिर आहे.  जसा  दरवाजा उघडला, तसे तोंडावर फड फड करत कबुतरे आली.  कुबट वासात दर्शन करून बाहेर आलो.  कळसुबाई सर केल्याचा आनंद निश्चितच अवर्णनीय ! त्यानंतर होडीने अमृतेश्वर मंदिर, रतनगड,  नंतर रंध्र धबधबा  व भंडारदरा धरण, असा प्रवास झाला.   
        एक असाच अचाट उपक्रम म्हणजे सांता क्रुझ ते तानसा तलाव, असा जाऊन येऊन जवळ जवळ २२० कि.  मी.  सायकल प्रवास. एकाच दिवसात. आम्ही ६ जण होतो. एकट्या विवेककडे स्वतःची (डायनामो वाली ) सायकल. बाकी सर्वांच्या भाड्याच्या सायकली.  किती हा अतिरेकीपणा, आज कल्पनाही करवत नाही.  
     त्या नंतर अत्यंत साहसी असा बद्रीनाथ, Valley of  Flowers,  हेमकूठं साहेब (१५,२१० ft), वसुधारा धबधबा, असा प्रवास मोजक्या मित्रांबरोबर झाला. 
        असे कितीतरी प्रसंग आहेत. सगळे सांगणे शक्य नाही, म्हणून निवडक प्रसंग सांगितले. 
       हे सर्व विस्ताराने सांगण्याचे  प्रयोजन म्हणजे, तरुण वयात या  सर्व मित्र मंडळींमुळे स्वतःमध्ये योग्य गुण जोपासले गेले. साहसी वृत्ती, लोकांमध्ये सहजतेने मिसळण्याची सवय, व छोट्या गोष्टीतही आनंद घेण्याची वृत्ती, वगैरे. याचा  प्रभाव  पुढील आयुष्यावर व खास करून व्यवसायात  निश्चित दिसतो. हे सर्व या सरदार कट्ट्यामुळे शक्य झाले. सरदार कट्ट्याचा, व त्या सर्व मित्रांचा, मी शतशः ऋणी आहे. आज भाऊ राणे या जगात नसूनही  अनेक प्रसंगी त्याची आठवण सतत  येत असते.  काही दिवसांपूर्वी मी, मुलांनी आग्रह केल्याने त्यांना घेऊन त्या ऐतिहासिक सरदार कट्ट्यावर बसून आलो. मनात ४५ वर्षा पूर्वीच्या  आठवणी जाग्या झाल्या. परत इतिहासात जाण्याची इच्छा झाली. पण नको. मी तृप्त व समाधानी आहे, आता मुलांना त्यांचा इतिहास घडवू देत.                 
       आता कट्ट्याच्या  नावाबद्दल.  इतका  सर्फिंर्यांचा अचाटपणा  बघूनही तुम्हाला 'सरदार' या नावाबद्दल प्रश्न आहेच का ?

 

No comments:

Post a Comment