Thursday, 30 March 2017

अभूतपूर्व भूतान

अभूतपूर्व भूतान  

     दि. १९-३-२०१७  वेळ:  ०७:४५ : मुंबई विमानतळावरून  उड्डाण घेतल्याक्षणापासून मनात भूतानच्या प्रवासाची चलचित्र फीत सुरू झाली. मनात उत्सुकता होती या देशाबद्दल, तेथील लोक, त्यांची संस्कृती , तेथील निसर्ग व इतर अनेक गोष्टींबद्दल, ज्या इतर देशांपेक्षा वेगळ्या आहेत.  मुंबई ते कोलकाता व तेथुन पुढे बागडोगरा असा जवळ जवळ २४०० कि मी  चा प्रवास मजेत पार पडला.  ईशा टूरचा फलक घेऊन आमचे स्वागत कारण्यास भूतानी ड्रायव्हर 'येशी ' हजर होता. अत्यंत हसतमुख , उमदा  व तरुण होता  येशी. स्वतःहून पुढे होऊन आमचे सामान ताब्यात घेऊन आम्हाला गाडीच्या दिशेने घेऊन गेला. सर्वप्रथम आमचे लंच बॉक्सेस आमच्या ताब्यात देऊन स्वतः सामान गाडीवर व्यवस्थित चढवायला निघून गेला. 
       भारतातील बागडोगरा ते भूतानमधील Phuentsholing (फुन्तशोलींग) हा प्रवास जेमतेम १५४ कि मी चा. मुक्काम फुन्तशोलींगमधे. भारतातील जयगाव व भूतानमधील फुन्तशोलींग खरं म्हणजे एकच शहर. पण  कमान ओलांडली कि जाणवतो  जमीन अस्मानाचा फरक. 
   
        
   असा फरक पाहिल्यावर अत्यंत लाज वाटली भारतातील अस्वच्छतेची. भूतानच्या स्वच्छतेचे व शिस्तप्रियतेचे कौतुक वाटले पण आपल्या  सीमेअलीकडील घाणीचे साम्राज्य बघुन अत्यंत वाईट वाटले. वाटले, प्रत्येक दोन किमी वर झळकणाऱ्या ममता दीदीला ओरडून सांगावे, "अग बाई, तुझे चार दोन पोस्टर कमी लागले तरी चालेल, पण कमीतकमी भारताच्या हद्दीतील बंगालमधील 'जयगाव ' तरी 'स्वच्छ' ठेव !"  १२५ करोड आबादीच्या भारताची, विदेशी प्रवाश्यांकडून इतकी मानहानी नको. थोडी तरी लाज बाळग. थोडा तरी धडा शिक, जेमतेम ८ लाख लोकसंख्येचा  चिमुकल्या भूतानकडून. अर्थात, धडा शिकायचा आहे आपण सगळ्यांनीच. मोदींच्या 'स्वच्छ भारत' या आव्हानाची,  नुसती घोषणा न राहता,  जनआंदोलनात  परिवर्तन  होण्याची अत्यंत तातडीची  गरज आहे.
        दुसरा महत्वाचा फरक जाणवतो तो म्हणजे आनंदी, हसतमुख व मृदु भाषी लोक. जसा आमचा ड्रायव्हर, तसेच इतर सर्व भूतानी लोकहि. देश गरीब आहे पण लोक रडत बसणारे किंवा भीक मागणारे नाही. गचाळपणा, अव्यवस्थितपणा  शोधूनही सापडणार नाही. (आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे सांगण्याची काही गरज वाटत  नाही).  ग्रॉस नॅशनल हॅपिनेस (GNH ) ची संकल्पना मांडणारा व अंमलात आणणारा भूतान देश आहे, यात आश्चर्य नाही. वास्तविक परिस्थिती,  GNH Index ला दुजोरा देणारीच आहे, यात शंका नाही.
        पुरुषी लिंगाची लॉकेट्स, फ्रीझ मॅग्नेटस, मुक्तपणे दिसत होती. आमच्या गाईड किमीने तर विकेटच घेतली. लाकडी लिंग दाखवून विचारते हे काय आहे ? काहींनी निरागसपणे विचारले "What is that ?"  किमी म्हणते  " It's Lingam. We are little naughty, you know !"   कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. चेहऱ्यावर भाव असा , कि काय हा मेला चावटपणा ! काही लाज लज्जा आहे कि नाही ?
            भूतानी लोकांच्या स्वभावातील हा खोडकरपणा मला आवडला. दांभिकपणा अजिबात नाही.


          दुसऱ्या दिवशी ईमिग्रेशन करून, उत्तरेला १६० कि मी वर पारो शहराकडे निघालो. ७२०० फूट (२,२००मी.) उंचीवरील पारो म्हणजे निसर्गरम्य शहर.  भूतानमधील एकमेव विमानतळ पारोला आहे. येथे येणाऱ्या विमानांना ५५०० मी. उंचीची हिमालयाची शिखरे पार करून यावी लागतात. त्यामुळे जगातील अतिशय दुर्गम कमर्शिअल विमानतळ अशी त्याची ख्याती आहे.  परिणामी, अगदी मूठभरच ( फक्त '८' :  डिसेंबर २०१४ पर्यंत)  कमर्शिअल वैमानिक येथे विमान आणण्यास ऑथोराइज्ड आहेत. 
        ताक्तसंग  व्हॅली  ( टायगर्स नेस्ट मोनेस्टरी  ) ट्रेक :    समुद्रसपाटीपासून १०,००० फूट (३०४८ मी.) उंचीवरील टायगर्स नेस्ट मोनेस्टरी, ही भूतानमधील बौद्ध धर्माचे उगमस्थान मानले जाते. ८ व्या शतकात  गुरु रिम्पोचे (उर्फ  गुरु पद्मसंभव ) हे तिबेट मधून वाघावर स्वार होऊन 'उडत' या स्थळी आले. ( येथे वाघ म्हणजे त्यांच्याच दैवी रूपाचे वर्णन मानतात, ) त्यांनी  दानवांचा संहार करून या ठिकाणी ३ वर्ष ३ महिने ३ दिवस  ध्यान करून पुढे भूतानमध्ये बौद्ध धर्माची स्थापना केली. या गुंफेच्या आसपास मोनेस्टरी  १६९२ मध्ये बांधली. (पुढे आगीमुळे भस्मसात झाल्यावर रोपवेच्या  साहाय्याने  आज दिसणारी मोनेस्टरी नव्याने बांधली. मूळ सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी रोपवे काढून टाकला ). हि माहिती  आमच्या भूतानी गाईड चिमीने  दिली.
              व्हॅलीच्या तळापासून ( ७००० फूट / २१०० मी ) हाईक ला सुरवात होते.   काळ्या  कभीन्न पहाडावर छोटासा पांढरा ठिपका, म्हणजे मोनेस्टरी दिसू लागतो.  खालील पहाडाचा  फोटो नीट पहा. त्यात तूम्हाला एक विक्राळ चेहरा दिसेल. हा  चेहरा आहे  गुरु रिम्पोचे यांचा रुद्रावताराचा !
















  
     


 टायगर्स नेस्ट हि अत्यंत कठोर ट्रेक होती. मानसिक व शारीरिक अश्या दोन्ही क्षमतांची कठीण परीक्षाच होती.  पण ९०० मी उंची चढून शिखर गाठण्याचा आनंद केवळ अवर्णनीय.  हे म्हणजे, जवळ जवळ ३६० मजले चढून मग उतरण्यासारखे  अचाट काम झाले !  १०,००० फूट उंचीवरून दिसणारे दृष्य अतिशय विहंगम होते. वरील  'चेलेला पास' चे छायाचित्र त्याची साक्ष आहे.
          या ट्रेकमधे एक भूतानी मनुष्य प्रत्येकाला  अगत्याने  'नमस्ते' म्हणत होता. मग मोठयाने 'हॅलो ' म्हणाला. म्हणतो कसा,
    " मै कबसे नमस्ते बोल रहा हूँ तो कोई रिस्पॉन्ड  नही कर रहा. इसलिये 'हॅलो' बोल रहा हुं. हम भुतानी लोग हमेशा स्मायलींग, और तुम लोग मुह लटकाके".
     "ऐसा नही है. थक गये हैं इसलिये मुस्कान नहि दिख रही "..   माझा लंगडा युक्तिवाद.
   त्याच्या म्हणण्यात तथ्य नक्कीच होते.

              स्थानिक म्युझिअम,  डिझॉन्ग,  मोनेस्टरी , मेमोरियल चोरटेम (स्तुप ) भूतानी संस्कृतीची झलक देतात.   पुनाखा  हे शहर भूतानची जुनी राजधानी होती. तेथे जातांना दो चुला पास  (१०,२०० फूट ) वरून जावे लागते.  तेथे १०८ मेमोरियल  चोरटेम (स्तूप)  आशी दोरजी वांगमो वांगचुक (ज्येष्ठ राणी माँ ) यांनी बांधलेले आहेत.  पुनाखा खाली असल्याने थोडे गरम आहे,  म्हणून विंटर कॅपिटल.  पो चु  व मा चू  या दोन नद्यांच्या संगमावर आहे पुनाखा डिझॉन्ग.  आता शब्दात वर्णन करण्यापेक्षा फोटोंचा आस्वाद घ्या. मला खात्री आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल हि फोटो यात्रा.
         


























        या भूतान प्रवासात त्यांची संस्कृती, लोक, निसर्ग सर्व पाहण्याची अनुभवण्याची संधी मिळाली. खुप काही शिकण्यासारखे आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे आहे त्या परिस्थितीत आनंदाने जीवन जगण्याची कला नक्कीच आत्मसात करायला हवी.  ईशा टूर्स व त्यांच्या सर्व प्रतिनिधींना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे, ह्या  अभूतपूर्व  भूतान दर्शनासाठी. धन्यवाद !