Wednesday, 4 June 2014

Dedicated to King George 1975 Reunion


कामाच्या गर्दीत अगदी अचानक मला एक फोन आला. मी फोन उचलला आणि विचारले कोण बोलतोय म्हणून .

"मी अमेय अकुला . रोल नंबर एक ."

मला काही क्षण  अर्थ बोधच होईना . जरा वेळाने टयूब पेटली.  ३९ वर्षानंतर मी माझ्या वर्ग मित्राशी बोलत होतो.  जुन्या आठवणी जागवल्या गेल्या. सेल नंबर लिहून फोन ठेवला.  तेव्हा पासून सगळच बदलून गेल . WhatsApp मुळे सगळे इतक्या छान रीतीने जोडले गेले. मला असे समजले कि आमच्या वर्गात ५३ विद्यार्थी होते. त्यातील २५ ते ३० जणांशी संपर्क झाला आहे. ३० मे रोजी सुनील नाईक याने पुढाकार घेऊन रियुनियन ठरविले होते. नेमके त्याच दिवशी मला अमेरिकेला प्रयाण करावयाचे असल्याने माझा नाईलाज होता. वाईट वाटत होते कि मी सगळ्यांना लगेच भेटू शकणार नाही ; पुढच्या वेळेस भेटू . कमीत कमी संपर्क तर झाला. WhatsApp Group तर आहे. या group मुळेच कार्यक्रम कसा चालला आहे याची झलक मिळत होती. ग्रुप फोटो पोस्ट केल्याने खूप छान वाटले. अर्थात,  मी फारच थोड्यांना ओळखू शकलो.

३९ वर्ष हा काही थोडा थोडका कालावधी नाही. इतके पाणी वाहून गेले ३९ वर्षात, कि ओळखणे शक्यच नाही. डोळ्यासमोर १९७५ चे चित्र. त्याची तुलना २०१४ च्या चित्राशी कशी होणार. सर्व जण आपल्या परीने स्थिर झालेले, भरभराट झालेली बघून खूप छान वाटले.  शारीरिक बदल इतके झाले (quite naturally ) कि काहींच्या डोक्यावरची कौले उडून गेली . मग कसे ओळखणार, सांगा बरे ? दुर्दैवाने  शिरीष खारकर, चिटणीस  व पराग साधले हे या जगात नसल्याचे कळले. वाईट वाटले.

माझ्या डोळ्यासमोरून ३९ वर्षापूर्वीचे शालेय जीवन चित्रपटाचा flashback जाऊ लागला.

सतीश सोमण आमच्या वर्गात अत्यंत हुशार व कायम पहिला नंबर. त्याने सांगितलेली 'जॉनी मेरा नाम ' सिनेमाची स्टोरी अजून लक्षात आहे.  तसे आमच्या वर्गात 'bright students' खूप होते.

एकदा सहावीत असताना सुन्दरी नावाच्या टीचर science शिकवत असत. त्यांचे दोन प्रॉब्लेम होते. एक त्यांना मराठी येत नव्हते तर आम्हाला इंग्लिश. अर्थात हि गोष्ट कालांतराने आमच्या पथ्यावरच पडली. एक जुनी आठवण त्या वेळेची. त्यांनी फळ्यावर  "Refraction ", असे विषयाचे नाव लिहिले. मुलांना काहीच कळले नाही. त्यांनी लागलीच अगत्याने मराठी पुस्तकातील "वक्रीभवन", हा शब्द लिहिला. त्यांना वाटले आता तरी मुलांना समजेल. मुले तरीही मक्ख ! मुलांसाठी दोन्हीही शब्द म्हणजे काला अक्षर भैस बराबर.

दुसरा प्रॉब्लेम फारच गमतीदार. त्यांनी जर कोणाला सागितले 'You  there, stand up and answer the question ',  की  नक्की कोणाला विचारले हे न कळल्याने एकाच वेळी दोघे जण  उठून उत्तर द्यायला लागायचे.  त्यावर त्या म्हणायच्या  'not you '. झालं लगेच  'आपल्याला नाही ' असे समजून दोघेही खाली बसायचे. madam कपाळावर हात मारून घेत ! काय करणार बिचाऱ्या , 'कही पे निगाहे कही पे  निशाना ' दृष्टी होती त्यांची.

एकदा अकोलकर madam फ्री वर्गावर असताना, 'जगात देव आहे कि नाही'  या विषयावर छान चर्चा रंगली होती. सुरीन उसगावकर ठामपणे निरीश्वरवाद मांडत होता.

७वीत असताना पुणे शिवनेरी छान ट्रीप झाली होती.

१०वीत  बोर्डी ला झालेला स्कौट कॅम्प आठवतोय. डांगीने  तेंव्हा  'यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी' या  गाण्यावर सुंदर group dance बसवला होता.  भट सरांनी camp fire मधे, chinese  भाषा शिकवून मजा आणली होती. आपल्या A division वर भाजी बनवण्याची पाळी होती व ती  जबाबदारी सगळ्यांनी  छान पार पाडली होती.

शिंदेने गायलेले  'कानडा राजा पंढरीचा '  हे  भक्ती गीत माझ्या अजूनही लक्षात आहे. नरेंद्र दातार पण सुंदर आवाजात भावगीते गायचा. 'एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात , शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात ' हे त्याचे गाणे मला स्मरणात आहे.

गुळवे ने केलेली क्रिकेट कॉमेंट्री, त्यातील रेडिओची खरखर सुद्धा तो हुबेहूब करत असे. पटवर्धन सुद्धा छान फ़्रनकेस्तेइनच्या  गोष्टी  सांगत असे.

वाघ बाई (मराठीच्या ) आठवतात का ? एकदा त्यांनी चक्क जेम्स बॉन्ड ची गोष्ट सांगितली होती !

Medusa हे टोपण नाव होते इंग्लिश च्या नाईक बाईंचे.

PT चे राउत सर म्हणजे  साक्षात टेरर.  इंग्लिश फेल्ट hat  व हातात वेताची छडी. त्यांच्या छडीने अनेकांची चड्डी ओली होत असे.

पुळेकर सरांचाही असाच धाक होता. दोन बोटे मुलांकडे दाखवत , "उद्या तू आणि तुझे पालक मला भेटायला या " असा सज्जड इशारा देत असत.

वर्गात दोन आवटे सर होते. छोटे science चे तर मोठे Maths चे. मोठ्यां सरांबद्दल मुलांना फार आदर होता.  त्त्यांची मुलांशी wavelength जुळत असे. एकदा मैदानात मुले  क्रिकेट खेळत असता, लंबू आवटे सर bat घेऊन आले व एक दोन strokes खेळून निघून गेले.

सोमण चे १० वि चे मार्क्स (५९८ ?) पाहून संस्कृत च्या teacher  त्याला म्हणाल्या तू आर्टस घे !

माझ्याजवळ अजून खुप मोठा खजिना आहे आठवणींचा. पण तो योग्य वेळी, व  सर्व क्लास साठी खुला करायचा आहे. तोपर्यंत वाट पहा !

Good  Day !