Wednesday, 4 June 2014

Dedicated to King George 1975 Reunion


कामाच्या गर्दीत अगदी अचानक मला एक फोन आला. मी फोन उचलला आणि विचारले कोण बोलतोय म्हणून .

"मी अमेय अकुला . रोल नंबर एक ."

मला काही क्षण  अर्थ बोधच होईना . जरा वेळाने टयूब पेटली.  ३९ वर्षानंतर मी माझ्या वर्ग मित्राशी बोलत होतो.  जुन्या आठवणी जागवल्या गेल्या. सेल नंबर लिहून फोन ठेवला.  तेव्हा पासून सगळच बदलून गेल . WhatsApp मुळे सगळे इतक्या छान रीतीने जोडले गेले. मला असे समजले कि आमच्या वर्गात ५३ विद्यार्थी होते. त्यातील २५ ते ३० जणांशी संपर्क झाला आहे. ३० मे रोजी सुनील नाईक याने पुढाकार घेऊन रियुनियन ठरविले होते. नेमके त्याच दिवशी मला अमेरिकेला प्रयाण करावयाचे असल्याने माझा नाईलाज होता. वाईट वाटत होते कि मी सगळ्यांना लगेच भेटू शकणार नाही ; पुढच्या वेळेस भेटू . कमीत कमी संपर्क तर झाला. WhatsApp Group तर आहे. या group मुळेच कार्यक्रम कसा चालला आहे याची झलक मिळत होती. ग्रुप फोटो पोस्ट केल्याने खूप छान वाटले. अर्थात,  मी फारच थोड्यांना ओळखू शकलो.

३९ वर्ष हा काही थोडा थोडका कालावधी नाही. इतके पाणी वाहून गेले ३९ वर्षात, कि ओळखणे शक्यच नाही. डोळ्यासमोर १९७५ चे चित्र. त्याची तुलना २०१४ च्या चित्राशी कशी होणार. सर्व जण आपल्या परीने स्थिर झालेले, भरभराट झालेली बघून खूप छान वाटले.  शारीरिक बदल इतके झाले (quite naturally ) कि काहींच्या डोक्यावरची कौले उडून गेली . मग कसे ओळखणार, सांगा बरे ? दुर्दैवाने  शिरीष खारकर, चिटणीस  व पराग साधले हे या जगात नसल्याचे कळले. वाईट वाटले.

माझ्या डोळ्यासमोरून ३९ वर्षापूर्वीचे शालेय जीवन चित्रपटाचा flashback जाऊ लागला.

सतीश सोमण आमच्या वर्गात अत्यंत हुशार व कायम पहिला नंबर. त्याने सांगितलेली 'जॉनी मेरा नाम ' सिनेमाची स्टोरी अजून लक्षात आहे.  तसे आमच्या वर्गात 'bright students' खूप होते.

एकदा सहावीत असताना सुन्दरी नावाच्या टीचर science शिकवत असत. त्यांचे दोन प्रॉब्लेम होते. एक त्यांना मराठी येत नव्हते तर आम्हाला इंग्लिश. अर्थात हि गोष्ट कालांतराने आमच्या पथ्यावरच पडली. एक जुनी आठवण त्या वेळेची. त्यांनी फळ्यावर  "Refraction ", असे विषयाचे नाव लिहिले. मुलांना काहीच कळले नाही. त्यांनी लागलीच अगत्याने मराठी पुस्तकातील "वक्रीभवन", हा शब्द लिहिला. त्यांना वाटले आता तरी मुलांना समजेल. मुले तरीही मक्ख ! मुलांसाठी दोन्हीही शब्द म्हणजे काला अक्षर भैस बराबर.

दुसरा प्रॉब्लेम फारच गमतीदार. त्यांनी जर कोणाला सागितले 'You  there, stand up and answer the question ',  की  नक्की कोणाला विचारले हे न कळल्याने एकाच वेळी दोघे जण  उठून उत्तर द्यायला लागायचे.  त्यावर त्या म्हणायच्या  'not you '. झालं लगेच  'आपल्याला नाही ' असे समजून दोघेही खाली बसायचे. madam कपाळावर हात मारून घेत ! काय करणार बिचाऱ्या , 'कही पे निगाहे कही पे  निशाना ' दृष्टी होती त्यांची.

एकदा अकोलकर madam फ्री वर्गावर असताना, 'जगात देव आहे कि नाही'  या विषयावर छान चर्चा रंगली होती. सुरीन उसगावकर ठामपणे निरीश्वरवाद मांडत होता.

७वीत असताना पुणे शिवनेरी छान ट्रीप झाली होती.

१०वीत  बोर्डी ला झालेला स्कौट कॅम्प आठवतोय. डांगीने  तेंव्हा  'यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी' या  गाण्यावर सुंदर group dance बसवला होता.  भट सरांनी camp fire मधे, chinese  भाषा शिकवून मजा आणली होती. आपल्या A division वर भाजी बनवण्याची पाळी होती व ती  जबाबदारी सगळ्यांनी  छान पार पाडली होती.

शिंदेने गायलेले  'कानडा राजा पंढरीचा '  हे  भक्ती गीत माझ्या अजूनही लक्षात आहे. नरेंद्र दातार पण सुंदर आवाजात भावगीते गायचा. 'एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात , शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात ' हे त्याचे गाणे मला स्मरणात आहे.

गुळवे ने केलेली क्रिकेट कॉमेंट्री, त्यातील रेडिओची खरखर सुद्धा तो हुबेहूब करत असे. पटवर्धन सुद्धा छान फ़्रनकेस्तेइनच्या  गोष्टी  सांगत असे.

वाघ बाई (मराठीच्या ) आठवतात का ? एकदा त्यांनी चक्क जेम्स बॉन्ड ची गोष्ट सांगितली होती !

Medusa हे टोपण नाव होते इंग्लिश च्या नाईक बाईंचे.

PT चे राउत सर म्हणजे  साक्षात टेरर.  इंग्लिश फेल्ट hat  व हातात वेताची छडी. त्यांच्या छडीने अनेकांची चड्डी ओली होत असे.

पुळेकर सरांचाही असाच धाक होता. दोन बोटे मुलांकडे दाखवत , "उद्या तू आणि तुझे पालक मला भेटायला या " असा सज्जड इशारा देत असत.

वर्गात दोन आवटे सर होते. छोटे science चे तर मोठे Maths चे. मोठ्यां सरांबद्दल मुलांना फार आदर होता.  त्त्यांची मुलांशी wavelength जुळत असे. एकदा मैदानात मुले  क्रिकेट खेळत असता, लंबू आवटे सर bat घेऊन आले व एक दोन strokes खेळून निघून गेले.

सोमण चे १० वि चे मार्क्स (५९८ ?) पाहून संस्कृत च्या teacher  त्याला म्हणाल्या तू आर्टस घे !

माझ्याजवळ अजून खुप मोठा खजिना आहे आठवणींचा. पण तो योग्य वेळी, व  सर्व क्लास साठी खुला करायचा आहे. तोपर्यंत वाट पहा !

Good  Day !















Tuesday, 14 January 2014

"अरेच्या !"

"अरेच्या !"

सर्व प्रथम  मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.  तिळगुळ घ्या व गोड गोड बोला.

"अरेच्या "  हे टायटल बघून अजिबात भाम्बावून जाऊ नका.  डोक शांत ठेवण्याची  हि कल्पना माझी नाही. मला आवडली म्हणून हा blogg प्रपंच.

एकदा अद्वैत बरोबर कारने चिंचोळ्या रस्त्याने जात असता अचानक समोर एक रिक्षा आडवी आली. रस्त्याच्या मधोमध उभी करून त्यातून प्रवासी उतरू लागले. आपण चुकीच्या ठिकाणी पार्क केल्याने लोकांना त्रास होतो आहे याची थोडीही जाणीव त्याला नव्हती. ' त्यात काय ?' अशी मग्रुरी दिसत होती. मला अचानक ब्रेक लावावा लागल्याने चिडून काही बोलणार , तेवढयात अद्वैत मला थांबवीत म्हणाला "अरेच्या ".  मला उद्देशून तो म्हणाला जाऊ दया हो बाबा आपण कशाला रक्त तापवून घ्यायचं. सोडून दया.

अंतर्मुख होऊन विचार केला गाडी चालवितांना असे प्रसंग अनेकदा येतात. प्रत्येक वेळी आपण react झालो तर कायमचा रक्त दाब ओढवून घेऊ. त्यापेक्षा नुसते " अरेच्या " म्हणा आणि सोडून दया, काय फरक पडतो तो बघा.  भले खोटे खोटे का असेना ही प्रतिक्रिया,  पण "अरेच्या " मुळे डोके शांत राहते हे खरे.

 दर वेळेला  हे "अरेच्या " कामाचे नाही.  तरीही  बऱ्याच वेळेला आपण overreact करतो. निदान तेंव्हा तरी "अरेच्या" चा उतारा  छान काम करतो.

नुसते ड्रायव्हिंग करतानाच नव्हे तर इतर वेळीही आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात. वादावादी, तंटे, झटापटी , या सर्वांचा एक परिणाम निश्चित असतो, BP.  पेपर वाचल्यावर सुद्धा डोकं तापून तावातावात वाद घालतो आपण.  कधी कधी अतिशय क्षुल्लक प्रसंगामुळे आपण क्लेश करून घेतो काही कारण नसताना.  नंतर पश्चाताप करण्यापेक्षा नुसते "अरेच्या " म्हणा आणि सुटा.

हे फार अवास्तव वाटू शकते.  कधी प्रसंग असा असतो की आपण "अरेच्या " वर सोडू शकत नाही. योग्य प्रतिक्रिया व्हायलाच पाहिजे. पण असे अपवादात्मक प्रसंग कमी असतात. कधी react करायचे व कधी "अरेच्या" म्हणायचे,  हे तारतम्य आपल्याला असायलाच हवे.  

मला या गोष्टीचा इतका छान अनुभव येऊ लागला कि मी वारंवार व वेगवेगळ्या प्रसंगी हे अस्त्र वापरू लागलो.  आता अद्वैत मला म्हणतो " बाबा, अतिरेक करू नका ; मी केवळ गम्मत म्हणून बोललो होतो. "

गमतीगमतीत का होईना, पण किती महत्वाचा मंत्र अद्वैत ने दिला.
 तुम्हीही वापरून बघा आणि स्वतःच अनुभव घ्या .

"  अरेच्या  "


Sunday, 1 December 2013

पृथ्वीवरील भूनंदनवन ( Kashmir )

पृथ्वीवरील भूनंदनवन 

    आयुष्यात एकदातरी पृथ्वीवरील भू नंदनवनात (अर्थात, काश्मीरला) जाण्याचे स्वप्न असते. मला अशी संधी जून महिन्यात मिळाली. ते सर्व क्षण फोटोच्या  रूपाने जतन केले आहेत. त्या आनंदाचा अनुभव तुम्हीसुद्धा हे फोटो पाहून घेऊ शकता.